वृद्धाश्रमांची संख्या आता वाढतच चाललीय. ही काळाची गरज आहे असेच आपले म्हणायचे. सध्या कुटुंबामधील संवादाला ओहटी लागलीय आणि विसंवादाच्या सागराला मात्र भरती येतेय म्हणतात. पण केवळ एवढेच कारण असेल का ? खूपशा ज्येष्ठांची मुले नोकरीच्या निमित्ताने परदेशी आहेत. मग मातापिता एकटे पडून लगेचच सैरभैर होतात. ‘ पावले चालती पंढरीची वाट ‘ या थाटात वृद्धाश्रमाची वाट पकडतात.
नुकताच अशा एका ‘सिनियर सिटीझन होम्स’ मध्ये जाण्याचा योग आला. घरून निघताना सख्ख्या शेजाऱ्यांना चेष्टेच्या सुरात म्हटले, ‘छान वाटला तर आम्हीही तिथे रहायचा विचार करू.’ सगळ्यांचे डोळे एकदमच मोठ्ठे झाले.

चाळीसएक कुटुंबानी तिथं आपली पालं टाकली होती. फाटकातून आत जाताच गणरायाचं सुंदरसं देऊळ दिसलं. रोज सकाळी साडेनऊची आरतीची वेळ असते तिथे. गडबडीने एका सिमेंटकुटीमध्ये हातातील पिशव्या ठेवल्या आणि तिथल्या भक्तांबरोबर आरतीचा नादब्रह्म सुरु झाला. पूर्वी शांत जागी वसलेला हा आश्रम शहराने पाय पसरल्याने चक्क हायवेवर आला होता. रहदारीचा गोंगाट वाढत होता, तरीही देवळातील घंटेचा आवाज व गळ्यातून बाहेर पडणारे भक्तीमय सूर एका संथ लयीत गणेशाची आराधना करीत होते. प्रसाद ग्रहण करुन थोड्याच वेळात कॅन्टीनमध्ये चहाचा तसेच तेथील रहिवाशांबरोबर गप्पांचा आस्वाद घेत बसलो. एक अमृत महोत्सवी जोडी आपसात तिथे संस्कृतमध्ये बोलत होती. उत्सुकतेने त्यांच्याजवळ जाऊन बसलो. आमच्या आग्रहाखातर त्यानी काही हिंदी, मराठी स्वरचित कविता व संस्कृतमधील इशोपनिषद्चे श्लोकही अर्थासह ऐकवले. ज्ञान मंदिरात या ॠषीस्वरुप जोडप्याच्या सहवासाचा आम्ही छान आनंद लुटला.
प.पू. बाबा बेलसरेंच्याकडून अनुग्रह घेतलेली व त्यांचा सहवास लाभलेली शुभ्र पांढर्या साडीतील एक तरुण वृद्धा ताठ कण्याने खुर्चीत बसून वर्तमानपत्र वाचत होती. आपले कौतुक ऐकले न ऐकलेसे करुन एक सुंदर स्मितरेषा तिने चेहर्यावर उमटवली. तेवढ्यात उत्साह ओसंडून वाहणारी एक त्रिमूर्ती आम्हाला सारा परिसर दाखविण्यासाठी पुढे सरसावली. त्यातील एका मूर्तीला तर मिडास टच लाभलेला होता. त्याची नोकरीची सोनेरी वर्षे कुवैतमधील राजमहाल सोन्याने मढवण्यात गेली होती. संपूर्ण काॅम्प्लेक्स पाहून झाल्यावर आम्ही एका प्रशस्त हाॅलमध्ये गप्पा मारत बसलो. खुर्च्यांचे रिंगण आखले होते. गप्पाटप्पा झाल्यावर तेथील एकेक कलाकार पुढे सरसावला. आता गाण्याची मस्त मैफील रंगात आली.

जेवणाची वेळ झाली होती. डायनिंग हॉलमध्ये जमून आता खाद्यपदार्थांचे रंग भरवायचे होते. जेवणगृहात जाताजाता वाटेत सुसज्ज जीम दिसली. व्हीलचेअरवर बसून एक सराईत व्यायामपटू आपली तब्येत फिट राखण्याचा प्रयत्न करीत होता. सकाळच्या गप्पांमध्ये गाण्याची रंगत भरणारे “किशोरकुमार” गडबडीने कुठेसे चालले होते. गावातील एका सभागृहात संध्याकाळी त्यांचा गाण्याचा कार्यक्रम होता. काय मस्त छंद जोपासत होता हा गायक !
संध्याकाळचे फिकट सोनेरी रंग आता पश्चिम दिशेकडे हळूहळू पसरू लागले होते. आम्हीही एक दिवसाच्या घनिष्ट ओळखीने जवळ आलेल्या इथल्या मित्रमंडळींचा निरोप घ्यायची वेळ आली होती. आमच्या घरी येण्यासाठी या सर्वांना मनापासून आग्रह केला. आपल्याला कोणी प्रेमाने बोलवते आहे या भावनेनेच साऱ्यांचे चेहरे फुलले होते. दूरवर कुठेतरी हिरवाई नजरेस येत होती. पण सिमेंटच्या रुक्ष जंगलात राहण्याशिवाय दुसरा पर्यायही त्यांच्याकडे नव्हता.
आम्ही घरी परत फिरलो. सोसायटीच्या आवारात येतोय न येतोय तोच माणसांच्या गजबजाटाने वेढले गेलो. नोकरी व्यवसाय करून घरी दमून भागून आलेला आमचा शेजार दिवसाची हालहवाल विचारण्यासाठी सुहास्य वदनाने पुढे आला. ‘ आब्बा ‘ म्हणत लहान मुले चिकटली. आकाशात पक्ष्यांचा किलबिलाट एकदमच वाढला. दिवसभरातील त्या चित्रात आणि आत्ताच्या चित्रात तेवढाच एक मोठा फरक होता. हा फरक दूर करता आला तर ……..!
~अरुण कुलकर्णी (वय७५) मो: ९८९००९६२१०
Disclaimer: WisdomStays is a discovery platform that lists eldercare facilities across India based on information provided directly by the respective facility owners or managers. While we strive to ensure that the details shared are accurate and up to date, we do not independently verify, endorse, or guarantee the services, quality, or compliance of any facility listed on our platform. WisdomStays is not liable for any deficiencies in service, experience, medical care, or infrastructure offered by these facilities. Users are strongly advised to conduct their own due diligence, visit the facility, and speak with the management before making any decisions. If you notice any outdated or incorrect information, please write to us — we will review and update it within 7 working days. This website is independently managed and is not affiliated with or endorsed by any government authority or agency.
SHASHIKANT
March 29, 2026 at 9:12 amI am going to establish Sr Citizen care center in Dhule district, Village area, 360 k.m. away from Mumbai and 425 k.m. from Pune. Please send me suggestions.