सुख-प्रदायिनी वास्तु…

आज सहजीवन सोसायटीच्या सीनियर ग्रुपच्या कट्ट्यावर एकदम शांतता… होती.

सोसायटीतील  ज्येष्ठ नागरिक संध्याकाळी साधारण सहा ते आठ या वेळेत खाली कट्ट्यावर जमून मनमोकळेपणाने विचारांची देवाण-घेवाण करत, थट्टा मस्करी करत. त्यात त्यांचा टाईमपास, एंटरटेनमेंट याबरोबरच एकमेकांची ख्याली खुशाली जाणून घेणे असे सगळेच होत असे. मग आज नेमकं काय झालं होतं की सगळे शांत होते?

 त्यांच्यातील एकाने शांततेचा भंग करत अचानक श्री देशपांडे काकांना विचारलं की तुमच्या शेजारच्या फ्लॅटमधील प्रभाकररावांना नक्की कुठे ठेवल आहे? पंधरा दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याच कट्ट्यावरच कळलं होतं.पण त्यानंतर तर ते घरी आले होते. मग पुन्हा ऍडमिट करावं लागला का?

देशपांडे काकांनी सगळ्यांची  काळजी लक्षात घेऊन सगळं सविस्तर सांगितलं.ते म्हणाले

“प्रभाकरला पॅरालिसीसचा झटका आला व  त्याच्या मुलाने लगेचच हॉस्पिटलला ऍडमिटही केल. डॉक्टरांनी पण पूर्ण प्रयत्न केले , परंतु त्यांना पूर्वस्थितीत आणण्यात यश आले नाही. दवाखान्यात ठेवूनही काहीही फरक पडण्याची शक्यता नसल्याने हॉस्पिटलने त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली. यावर फिजिओथेरपी हा एक उपाय आहे व मुलाला तो करायचा ही होता. पण मुलगा ,सून दोघेही नोकरी करीत असल्याने प्रभाकर जवळ घरी कोण राहील हा एक मोठा प्रश्न होता . त्याची सुश्रुषा करण्यास घरी कोण थांबू शकेल? फिजिओथेरपिस्ट आले तर घरी कोण असेल? असे सगळेच प्रश्न होते. त्यामुळे त्यांना आपल्या इथून साधारण चार एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पॅलेटिव्ह केअर सेंटरला ऍडमिट केल आहे. “

पॅलेटिव्ह केअर हा शब्दच त्यांच्यातील बऱ्याच लोकांना नवीन होता.बहुतेक लोकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसत होतं. हे लक्षात आल्यावर देशपांडे काका म्हणाले मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो. पण त्याआधी आपण एक ठरवू या की या विषयावर कोणाला काही शंका असल्यास मोकळेपणाने आपसात चर्चा करायची ,माहिती  घ्यायची पण कुठेही कुजबूज /कॉमेंट्स/ कोणावर दोषारोप करायचे नाहीत.”

सगळे कट्टेकरी शांतपणे देशपांडे काकांकडे  पाहत होते व त्यांच्या म्हणण्याला मूक प्रतिसाद ही मिळाला होता.

 मग देशपांडे काकांनी सांगितले की जेव्हा एखाद्या रुग्णावरील दवाखान्यात होण्यासारखे सगळे उपचार संपतात, तेव्हा हॉस्पिटलमधून त्याला डिस्चार्ज देतात. पण अशा रुग्णाला सतत नर्सिंगची, वैद्यकीय एक्सपर्टची गरज भासते.   या सोयीसुविधा घरी उपलब्ध करून देता येत नाहीत म्हणून अशा वेळा  या पॅलेटिव्ह केअर सेंटरला ऍडमिट करतात. इथे त्यांची सर्व प्रकारे म्हणजे शारीरिक ,मानसिक  भावनिक व आध्यात्मिक अशी सर्व स्तरावर काळजी घेतली जाते. अशा रुग्णाचं दु:ख, वेदना कमी करुन उर्वरित आयुष्य जास्तीत जास्त सुसह्य/सुखकर कसं जाईल याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच त्याला ‘सुख प्रदायिनी वास्तु’ असे म्हणता येईल.

देशपांडे काकांनी पुढे हे ही सांगितलं की मी स्वतः तिथे जाऊन प्रभाकरना भेटून आलो. त्यावेळी त्यांचा मुलगा, सून दोघेही त्यांच्याजवळ होते. त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली व मी पण पॅलेटिव्ह केअर सेंटर म्हणजे नक्की काय हे समजून घेतलं. तेथील अॅडमिनीस्ट्रेटर पण खूप छान बोलल्या.

 

तिथली व्यवस्था तर छानच होती. तिथल्या मॅनेजरशी गप्पा करताना माझ्या एक लक्षात आले की आपल्या रुग्णाला बरं  वाटाव , त्याला घरच्यांची अनुपस्थिती जाणवू नये याचा तेथील स्टाफ जास्तीत जास्त प्रयत्न करतो. त्या हे ही म्हणाल्या की तुम्ही म्हणजे त्यांचे मित्र  त्यांना येऊन भेटू /बोलू शकता ज्यामुळे त्यांना बरं वाटेल.

मित्रांनो मला तरी ही कल्पना खूपच चांगली वाटली. आपल्यापैकी ज्यांची तब्येत ठीक आहे, जे  या कामासाठी वेळ देऊ शकतात ,त्यांनी ठरवून ग्रुपने दोघे / तिघे असे तिथे जाऊन प्रभाकरशी गप्पा मारु या.

प्रभाकरच कशाला ,आपण इतरही तिथल्या रुग्णांना मैत्रीच्या बंधनात बांधून घेऊ शकतो.

शेजारीच बसलेले जोशी काका लगेच म्हणाले हे खरोखर एक मोठं समाजकार्य होईल. आपल्याकडे वेळ आहे ,हे काम आपण करू शकु इतपत शक्ती आहे. आपण आपला वेळ जरूर या चांगल्या कामासाठी खर्च करावा. आपल्यालाही आयुष्याच्या संध्याकाळी एक ध्येय सापडेल व मानसिक समाधानही मिळेल. यावर सगळ्यांचे एकमत झाले.

कट्ट्यावर हा संवाद चालू असतानाच प्रभाकरचा मुलगा दिलीप सेंटरहून परतत होता. देशपांडे काकांनी त्याला जवळ बोलावलं. प्रभाकरची चौकशी केली व रात्रीच्या जेवणाला दोघेही आमच्याकडेच या , तुझ्या काकूचा स्वयंपाक तयार आहे हे सांगायला ते विसरले नाहीत.

खरोखरच नावाप्रमाणे त्या सोसायटीतल्या सर्वांच एकत्रित राहणं हे एक आदर्श सहजीवन होत. सगळेच अडीअडचणीला एकमेकांसाठी धावून जात.

दिलीपच्या डोळ्यात अश्रू होते. “खरं सांगतो तुम्हाला काका.. मी तर आता कट्ट्यावर माझी खरडपट्टी निघणार या तयारीने आलो होतो. तुम्ही मुलं आई बापाची जबाबदारी घेत नाही, त्यांना वाऱ्यावर सोडता वगैरे वगैरे ऐकायला मिळेल असं वाटलं होतं. पण तुम्ही सगळ्यांनी माझी अडचण समजून घेतली आणि माझ्या पाठीशी उभे आहात, खूप बरं वाटलं.”

जोशी काकांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला. त्याला म्हणाले काळजी करू नकोस. आम्ही पण दोघं तिघं बॅचने गप्पा मारायला जात जाऊ. तेवढच सगळ्यांच्या भेटी झाल्या की त्यालाही बरं वाटेल.

दिलीप सर्वांना धन्यवाद देऊन आपल्या घरी परतला कारण त्याला लगेच दीपिकाला पण घरी आणायचं होतं.

कट्ट्यावर आता पुढचं प्लॅनिंग सुरू झालं. खेडकर काका म्हणाले की ही पॅलेटिव्ह केअरची कल्पना खरोखर चांगली आहे कारण आता विभक्त कुटुंब पद्धतीत घरांत ज्येष्ठांची अशा प्रकारे काळजी घ्यायला खरंच कोणी नसतं. मुलं ,मुली पण अशा वेळा हताश होतात. अशा सेंटरला आपल्याला जर काही मदत करता आली म्हणजे आज प्रभाकर ऍडमिट आहे म्हणून नाही तर एरवी पण आपण काही करू शकलो तर खरंच आपल्याला समाधान मिळेल. त्या दृष्टीने तिथे गेल्यावर तेथील ऍडमिनिस्ट्रेशनशी चर्चा करायची असाही निर्णय झाला. बोलता बोलता बराच उशीर झाला होता म्हणून मंडळी आपापल्या घरी परतली.

पुढे जवळजवळ ४/५ महीने प्रभाकरची घरच्या सारखी काळजी पॅलेटिव्ह केअर सेंटरने घेतली.त्यांनी शेवटचा श्वास तिथेच घेतला, तेव्हा त्यांच्या जवळ सहजीवन सोसायटीतील मित्र परिवार,आप्तेष्ट होतेच. केअर सेंटरने निधनानंतर पण त्यांना स्वच्छ आंघोळ वगैरे घालून ,तेथील सर्वांनी ईश्वरचरणी त्यांच्या सद्गतीसाठी प्रार्थना करुन नंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला.हे सगळं पाहून सहजीवनवासीयांचे डोळे भरून आले होते….

त्यानंतरही ही कट्ट्यावरील मंडळी आपल्या वेळ व शक्तीचा योग्यप्रकारे उपयोग व्हावा म्हणून सेवा देण्याच्या उद्देशाने त्या सेंटरशी जोडलेले राहीले.अशाप्रकारे सहजीवन सोसायटी सुख प्रदायिनी वास्तुशी संलग्न राहीली.

 गीता संवत्सर

(लेखिका आस्था फाउंडेशन औरंगाबादच्या स्वयं सेविका आहेत.)

Comments

  • No comments yet.
  • Add a comment

    Disclaimer: WisdomStays is a discovery platform that lists eldercare facilities across India based on information provided directly by the respective facility owners or managers. While we strive to ensure that the details shared are accurate and up to date, we do not independently verify, endorse, or guarantee the services, quality, or compliance of any facility listed on our platform. WisdomStays is not liable for any deficiencies in service, experience, medical care, or infrastructure offered by these facilities. Users are strongly advised to conduct their own due diligence, visit the facility, and speak with the management before making any decisions. If you notice any outdated or incorrect information, please write to us — we will review and update it within 7 working days. This website is independently managed and is not affiliated with or endorsed by any government authority or agency.